सावधान ! QR कोड स्कॅन घोटाळ्यापासून सुरक्षित राहा !
विज्ञान-तंत्रज्ञानात होणाऱ्या नवनवीन संशोधनांचा परिणाम सामान्य व्यक्तीच्या जीवनावर नक्कीच होतो. सध्या हातोहात दिसणाऱ्या स्मार्टफोनमुळे तर मोठी क्रांतीच घडवली आहे. आर्थिक व्यवहारात मोठे बदल झाले आहेत. आता खरेदीसाठी सोबत पैसे घेऊन जाण्याची गरजच उरलेली नाही. ऑनलाईन पेमेंट व्यवस्थेमुळे काही क्षणात पैशांची देवाणघेवाण करता येते. लहान लहान खरेदी, पेट्रोलपंप असो, नाही तर शॉपिंग मॉल्स. हल्ली ऑनलाईन पेमेंट करणं अगदी सोप्पं झालं आहे. मोबाईलमधून QR कोड स्कॅन करा आणि अवघ्या काही सेकंदात पेमेंट होते. संपूर्ण जगभरात सध्या ऑनलाईन पेमेंट करण्यावर भर दिला जात आहे. या डिजिटल व्यवहारांमध्ये आपला देश जगभरात आघाडीवर आहे. मात्र, यासोबतच अनेक घोटाळेदेखील समोर येत आहेत. सायबर गुन्हेगार नागरिकांच्या फसवणुकीसाठी विविध मार्ग अवलंबत आहेत. QR कोड फसवणुकीमुळे बँक ग्राहकांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. अलीकडेच क्यूआर कोडद्वारे ऑनलाइन फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अशावेळी लोकांना क्यूआर कोडद्वारे पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले जाते. अनेकदा खरेदीच्या वेळी स्कॅन केलेला QR कोड तुमचे खातेही रिकामे करू शकतो, हे ग्राहकांनी ध्यानात घ्यायला हवे.
स्कॅन करताना सावधानवस्तू खरेदीच्या वेळी पैसे देण्यासाठी आपण जो QR कोड स्कॅन करीत आहोत, त्याद्वारे सायबर गुन्हेगार तुमच्या फोनमध्ये एक व्हायरस उत्पन्न होईल, अशी व्यवस्था करतात. याद्वारे तुमच्या बँक खात्याची माहिती मिळवतात. त्यानंतर थोड्याच वेळात तुमच्या खात्यावरील रक्कम लंपास होऊ शकते. खरेदी करताना व पैसे देताना समोर असलेला QR कोड त्या व्यक्तीचा, शॉपचा किंवा संस्थेचा आहे का याची नेहमी तपासणी करा. तुमच्या बँक खात्यातून किती रक्कम त्या QR कोडद्वारे वळती झाली आहे, हेही आवर्जून तपासून घ्यायला हवे.
QR कोडचे आमिषQR कोड फसवणुकीचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यातलाच एक आहे QR स्क्रॅच कार्ड घोटाळा. यात सायबर गुन्हेगारांकडून ग्राहकाला सर्वप्रथम एक ईमेल किंवा मेसेज पाठवला जातो. यात काही बक्षीस दिले जात असल्याचे आमिष दाखवले जाते. याशिवाय अनेकवेळा फोन करून स्कॅमर्स स्वतःला नामांकित कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगतात. आमची कंपनी स्पेशल डिस्काउंट, कूपन कोड किंवा बंपर डिस्काऊंट देत असल्याचे सांगतात. हे बक्षीस स्वीकारण्यासाठी किंवा सवलतीचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला QR कोड स्कॅन करण्यास सांगितले जाते. कोड स्कॅन केल्यानंतर ग्राहक दुसऱ्याच फसव्या वेबसाईटवर जातो आणि फसवणूक होते. सायबर गुन्हेगार बऱ्याच नागरिकांना प्रलोभने देऊन, आमिष दाखवून फसवणूक करतात. बक्षीस, भेटवस्तू, सूट किंवा कूपनचे आमिष दाखवून ग्राहकांना QR कोड स्कॅन करायला लावतात. त्यानंतर स्कॅमर्स ग्राहकाची बँक खात्याची माहिती हॅक करून त्यांच्या बँकेतील रक्कम लंपास करतात. घोटाळ्याची ही पद्धत खूप सोपी आहे. त्याचा फटका अनेकांना बसला आहे. अनेक नागरिक या बक्षिसाच्या आमिषाला बळी पडले आहेत. त्यामुळे QR कोड स्कॅन करताना सावध राहून ऑनलाईन पेमेंट करणे गरजेचे आहे.
अशी टाळता येईल फसवणूक * कोणत्याही अज्ञात ईमेल, मेसेज किंवा कॉलवर विश्वास ठेवू नका. * केवळ अधिकृत कंपनीने दिलेल्या बक्षिसावर विश्वास ठेवा. * अज्ञात मेसेज, ईमेल किंवा कॉलवर दिलेले बक्षीस मिळवण्यासाठी पुढील कार्यवाही करू नका. * आपली वैयक्तिक माहिती कुणालाही देऊ नका. * ऑनलाईन व्यवहार करताना सजग राहा. * कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुमचा UPI आयडी किंवा बँक खाते तपशील देऊ नका. * अनोळखी व्यक्तींकडून मिळणारा QR कोड स्कॅन करू नका. * बँकिंग व्यवहाराबाबत आलेले OTP कुणालाही सांगू नका. * एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत ऑनलाइन व्यवहार करता सत्यता तपासा. * तुमचे सर्व UPI आयडी एका गुप्त कोडने सुरक्षित ठेवा. * फोनमध्ये बँकेविषयक माहिती लॉक करून ठेवा. * याचा गुप्त कोड कुणालाही सांगू नका. * अनोळखी व्यक्तींसोबत नगदी व्यवहार करण्याचा प्रयत्न करा.