बँक ग्राहकांनो, सावध राहा, दक्ष राहा ! अशी रोखता येईल आर्थिक फसवणूक
संगणकीय पद्धतीने बँकिंग व्यवहार जसजसे गतिमान होत गेले, तसतशी अनेक आव्हानेही बँकिंग क्षेत्रासमोर उभी राहिली. त्यात सर्वाधिक महत्वाची गोष्ट म्हणजे बँक ग्राहकांची सुरक्षा. बँक ग्राहकांना जलद आणि सुरक्षित आर्थिक सेवा पुरवण्याबरोबरच, त्यांना जागरूक, सजग आणि दक्ष करण्याचे कार्यही बँकांनी केले आहे. मराठवाड्यातील अग्रणी देवगिरी बँक ही ग्राहकांची सर्वाधिक विश्वासार्ह बँक म्हणून ओळखली जाते. बँकेने ग्राहकांना जलद आणि सुरक्षित बँकिंग सेवा पुरवण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्राहक जागृतीसाठी देवगिरी बँकेतर्फे वेळोवेळी आर्थिक सुरक्षिततेवर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. सध्या आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. अशावेळी बँक ग्राहकांना ऑनलाइन फसवणुकीपासून वाचविण्यासाठी बँकिंग व्यवहारात जागरूकता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन बँकिंग आणि इतर डिजिटल व्यवहार आमच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनले आहेत. या सुविधांमुळे आपले जीवन सोपे आणि जलद झाले आहे. परंतु या ऑनलाईन सेवा वापरताना आपणही सावधगिरी बाळगली पाहिजे. दक्ष राहिले पाहिजे. काळ जसजसा बदलत आहे, तसतसे आपणही हुशार जागरूक झाले पाहिजे. देशभरातील सायबर गुन्हेगारी, आर्थिक फसवणुकीच्या घटना रोखायच्या असतील तर ग्राहकांनी प्रत्येक आर्थिक व्यवहारावेळी काळजी घ्यायला हवी. सायबर गुन्हेगार नेहमीच बँक ग्राहकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊ शकतात, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आजघडीला स्मार्टफोन प्रत्येकाच्या हातात दिसतो. पैसे देण्याघेण्याचे व्यवहारही अगदी काही सेकंदात होतात. देशातल्या कुठल्याही व्यक्तीला पैसे पाठवणे त्यामुळे अत्यंत सोपे झाले आहे. त्यासाठी फोनमध्ये निरनिराळे ऍप्स आहेत. बँकाही नेटबँकिंग सेवा पुरवतात. पण हे नवीन तंत्रज्ञान जितक्या वेगाने पुढे जात आहे, तितक्याच वेगाने सायबर गुन्हेगारही अत्यंत चलाखीने वेगवेगळे मार्ग वापरत आहेत, ही बाबदेखील आपण ध्यानात घ्यायला हवी. ग्राहकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन हे गुन्हेगार लोकांना फसवण्याचे नवीन मार्ग शोधत असतात. कशी रोखायची ऑनलाइन आर्थिक फसवणूक? आज ऑनलाइन बँकिंग सुविधेने अनेक गोष्टी सोप्या केल्या आहेत, पण त्याचे काही तोटेही आहेत. सायबर गुन्हेगार ऑनलाइन बँकिंग व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना लक्ष्य करून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. पैशांच्या व्यवहारात छोटीशी चूक झाली तरी तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली तर आपोआपच आपणही सुरक्षित मार्गांचा वापर कसा करायचा हे निश्चितपणे जाणून घेऊ शकतो. आजकाल अनेक लोक ऑनलाइन बँकिंगला पसंती देतात परंतु ही हॅकर्ससाठी एक मोठी संधी ठरू शकते. तुमचे बँक खाते, बँकेविषयीची वैयक्तिक माहिती, बँक खाते तपशील, डेबिट - क्रेडिट कार्ड तपशील, पासवर्ड यांची चोरी होऊ शकते. तुमची बँक खात्याची माहिती हॅकर्सच्या हाती लागल्यास ते त्याचा गैरवापर करू शकतात. यापासून वाचण्यासाठी, ऑनलाइन बँकिंगचा हॅकर्स आणि सायबर गुन्हेगार कसा गैरफायदा घेऊ शकतात, हे जाणून घेणे आवश्यक आहे. आपल्या काही चुका टाळल्यास मोठे नुकसान टाळता येते. कुणालाही ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवताना सर्वात आधी तो तुमच्या परिचयाचा आहे का, हे आधी तपासून घ्या. तुम्ही ज्या लिंकद्वारे, वेबसाईटद्वारे किंवा ऍपद्वारे व्यवहार करीत आहात, ती खरी आहे की बनावट हे प्रथम तपासणे आवश्यक आहे. कारण बऱ्याचदा फसवणूक करणारे लोक बनावट वेबसाइट तयार करतात. त्यामुळे विश्वासार्ह वेबसाइटवरूनच बँकिंग व्यवहार करावेत. वेबसाइटची विश्वासार्हता तपासण्यासाठी, वेबसाइटचा पत्ता https ने सुरू होतो याची खात्री करा. बरेचदा आपली बँक खात्याची माहिती, खाते क्रमांक, पासवर्ड अशी माहिती ग्राहकांना लिहून ठेवण्याची सवय असते. यात क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डची माहिती फोनमध्ये सेव्ह केली जाते. परंतु हॅकर याच गोष्टीचा गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे तुमची बँकविषयक माहिती धोक्यात येऊ शकते. त्यामुळे फोनमध्ये किंवा अनोळखी वेबसाइटवर तुमची बँकविषयक माहिती सेव्ह करू नका. मजबूत पासवर्ड वापरा : बँकिंग व्यवहार करताना कधीही सोपे पासवर्ड वापरू नका, जसे की तुमचा जन्मदिन किंवा फोन नंबर, गाडीचा नंबर. तुमच्या पत्नीचे, मुलाचे नाव असे सोपे आणि ओळखता येतील असे पासवर्ड वापरू नका. पासवर्डमध्ये मोठी अक्षरे, लहान अक्षरे, संख्या आणि विशेष चिन्हे असावीत. तुमचे सर्व पासवर्ड वेळोवेळी बदलणे खूपच गरजेचे आहे. OTP शेअर करू नका : ऑनलाईन पद्धतीने पैशांच्या देवाणघेवाणीत OTP क्रमांक खूपच महत्वाचा असतो. त्यामुळे तुमचा OTP कोणालाही सांगू नका किंवा शेअर करू नका. जर तुम्हाला अनोळखी क्रमांकावरून OTP मागितला जात असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा. तुमच्या बँकेच्या अधिकृत वेबसाइट किंवा अॅपवरूनच ऑनलाइन व्यवहार करा. फिशिंग मेल्सपासून सावध राहा : बँक ग्राहकांनी अनोळखी क्रमांकावरून आलेल्या लिंक्स, मेसेजेस किंवा ईमेल्स अशा गोष्टींना कुठलाच प्रतिसाद देऊ नये. संशयास्पद ई-मेल्सवर क्लिक करू नका. तुमच्या बँकेची अधिकृत वेबसाइट किंवा अॅपवरूनच तुमच्या खात्याची माहिती नेहमी तपासा. तुमच्या बँकेची अधिकृत वेबसाइट किंवा अॅपवरूनच ऑनलाइन व्यवहार करा. अनोळखी ऍप डाऊनलोड करून त्यात बँकेची माहिती भरणे आवर्जून टाळा. पब्लिक वाय-फाय वापरू नका : बँकिंग व्यवहार करताना कधीही पब्लिक वाय-फायचा वापर करू नका. स्वतःचे अधिकृत इंटरनेट वापरा. अनोळखी किंवा सार्वजनिक नेटवर्कवरून तुमची बँकविषयक माहिती शेअर करू नका. तुमच्या बँकेच्या अधिकृत वेबसाइट किंवा अॅपवरूनच ऑनलाइन व्यवहार करा. बँकेने घालून दिलेली कार्यपद्धती वापरा. पैशांच्या व्यवहारात आपल्या बँकेचे अधिकृत ऍप वापरले तर फसवणुकीचा धोका टाळता येतो. संशयास्पद वेबसाइट्स किंवा अॅप्सवर क्लिक करू नका. जागरूक राहा : बँकिंग व्यवहार करताना नेहमी सावध राहा आणि संशयास्पद व्यवहारांकडे दुर्लक्ष करा. जर तुम्हाला काही शंका असल्यास, तुमच्या बँकेशी, तिथल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. अडचणीच्या वेळी बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधा. बँकेद्वारे आयोजित केलेल्या ग्राहक जागरूकता कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यास नवनवीन माहिती मिळते. वरचेवर वाढणारी सायबर गुन्हेगारी, ऑनलाइन आर्थिक फसवणूकीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी थोडीशी सावधगिरी आणि जागरूकता पुरेशी आहे. त्यामुळे नेहमी सावध राहा, सतर्क राहा. तुमच्या बँक खात्यातील व्यवहारांबद्दल काही शंका असल्यास तपास करा आणि तुमच्या बँकेची अधिकृत पद्धती वापरा. ग्राहकांनो, दक्ष राहा, जागरूक राहा, सुरक्षित राहा.