उत्साह, आनंद आणि खरेदीचा उत्सव अक्षय तृतीया
भारतीय माणूस आणि उत्सव यांचे नाते अतूट आहे. त्यामुळेच संस्कृतीतही साधारणतः प्रत्येक महिन्यात कुठला ना कुठला सण-उत्सव असतोच. उन्हाळ्यात हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा या दिवसापासून मराठी बांधवांचे नवीन वर्ष सुरू होते. ऐन उन्हाळ्यात येणाऱ्या पाडव्यानंतर प्रमुख सण येतो तो म्हणजे अक्षय तृतीयेचा. भारतीय संस्कृतीत अक्षय तृतीयेचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. ज्याचा कधीच क्षय होत नाही ते अक्षय आणि पंचांगातील तृतीया तिथी याचाच अर्थ असा की अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर तुम्ही जे काही कराल, त्यात कधीही कमतरता येणार नाही. त्यात कधीही घट होणार नाही. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक शुभमुहूर्त आहे. त्यामुळेच या दिवशी सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. नवीन घराची बुकिंग केली जाते. अनेक कुटुंबे फ्लॅट्स आणि रो-हाऊसची खरेदीही याच दिवशी करतात. याच शुभमुहूर्तावर अनेक जण स्वतःच्या घरात गृहप्रवेशाचा सोहळा साजरा करतात. हा दिवस स्वप्नपूर्तीचाही आहे. स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी अलिशान कार घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. या काळात बाजारातही अनेक ऑफर्स सुरु असतात. त्यामुळे या शुभमुहूर्तावर स्वतःच्या कारचे स्वप्न साकार करण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. एकंदरीत बाजारात अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर मोठी आर्थिक उलाढाल होत असते. बाजारात यानिमित्ताने वेगवेगळ्या ऑफर्सचा नुसता वर्षाव सुरु असतो. एका अर्थाने अक्षय तृतीया हा महाखरेदीचा उत्सवही असतो. या दिवशी खरेदी केलेली खरेदी अखंड, निरंतर, शाश्वत राहते. त्यात वृद्धी होते, अशी धारणा आहे. आपल्या महाराष्ट्रातील घराघरांमध्ये अक्षय तृतीयेचा उत्सव मोठ्या उत्साह आणि आनंदात साजरा होतो. गौरीचे हळदी-कुंकू हा समारंभही याच काळात होत असतो. घरोघर स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्रगौरीची स्थापना व पूजा करतात. चैत्रातील एखाद्या दिवशी हळदी-कुंकवाच्या निमित्ताने इतर महिलांना आमंत्रित केले जाते. त्यांना घरी बोलावून मोगऱ्याची फुले किंवा गजरा, आंब्याची डाळ किंवा भिजवलेले हरभरे आणि कैरीचे पन्हे देण्याची पद्धत आहे. यानिमित्ताने महिला वर्गाच्या भेटी होतात. अक्षय तृतीयेच्या काळात हळदी-कुंकू समारंभाचा हा प्रसंग प्रत्येक घरात असतो.
* भगवान परशुराम, महात्मा बसवेश्वर जन्मोत्सवअक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णूचा सहावा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुराम यांचा जन्मदिवस आहे. परशुराम हे जमद्ग्नि आणि रेणुकादेवी यांचे पुत्र होते. उन्हाळ्यातील प्रखर उन्हाच्या झळा, तप्त झालेली धरती अशा काळात म्हणजेच वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणुन प्रसिध्द आहे. अक्षय तृतीयेचे आणखी एक महत्व असे की, या दिवशी भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून, उत्साहात मिरवणूक काढली जाते. ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये या दिवशी पूजा आणि प्रार्थना केल्या जातात. परशुराम जन्मोत्सव साजरा केला जातो. या शुभमुहूर्तावर गंगास्नान, तीर्थयात्रा, दानधर्म या गोष्टींना अधिक महत्व आहे. महान सुधारक संत महात्मा बसवेश्वर यांची जयंतीही याच दिवशी असते. भारतीय इतिहासात माणसाच्या परिश्रमाचे मूल्य आणि त्याच्या कष्टाचे महत्व मांडणारे महात्मा बसवेश्वर हे एक थोर संत होते. चला, आपणही सारे एकत्र येऊन हा आनंदाचा उत्सव अक्षय तृतीया साजरी करूया. देवगिरी बँकेच्या विविध आकर्षक आणि सहज सुलभ कर्ज योजनांच्या माध्यमातून खरेदी करूयात. आकर्षक ठेवी आणि कर्ज योजनांच्या अधिक माहितीसाठी आजच देवगिरी बँकेच्या जवळच्या शाखेला भेट द्या. देवगिरी बँकेतर्फे सर्व ग्राहक, ठेवीदार आणि खातेदारांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा !