
जाणून घ्या कसा वाढवता येईल तुमचा सिबिल स्कोअर
वेळेचे पालन आणि वेळेचे महत्व याविषयी आपण सगळेच लहानपणापासून शिकत असतो. एकदा वेळ निघून गेली, की तुम्ही कितीही प्रयत्न केला, तरी ती पुन्हा आणता येत नाही. ज्याने वेळेचे पालन केले, त्याच्या जीवनात यशाचा मार्गही आणखी सोपा होतो. बँकिंग क्षेत्रात तर वेळेला अनन्यसाधारण महत्व आहे. हे महत्व ग्राहक आणि बँक यांच्यात चांगले संबंध वृद्धिंगत करते. आर्थिक व्यवहार जगतात सर्वात महत्वाचा असलेला सिबिल स्कोअर हा फॅक्टरही याच टाईम मॅनेजमेंट या तत्वाशी जोडला गेला आहे. चला, आज आर्थिक व्यवहारातील सिबिल स्कोअरचे महत्व, हा स्कोअर वाढवायचा कसा किंवा तो आहे तसाच राखून ठेवायचा कसा, हे जाणून घेऊया. कुठल्याही कर्जदाराच्या आयुष्यात सिबिल स्कोअर ही संकल्पना खूपच महत्वाची आहे. या सिबिल स्कोअरच्या आधारावरच आर्थिक जगतात तुमची पतमर्यादा ठरवली जाते.
कुठल्याही कर्जाची मंजुरी प्रकरणात सिबिल स्कोअरचा अत्यंत महत्वाचा वाटा आहे. तुमचा सिबिल स्कोअर कसा आहे, यावरच बँकेककडून तुम्हाला कर्ज मिळू शकते. तुमचा सिबिल स्कोअर खराब किंवा नकारात्मक असेल तर कुठलीही बँक, पतसंस्था, नॉन बँकिंग ऑर्गनायझेशन्स तुम्हाला कर्ज देताना हजारदा विचार करतील. सर्वप्रथम जाणून घेऊया सिबिल स्कोअर म्हणजे काय? तुम्ही तुमच्या जीवनात घेतलेली सर्व प्रकारची कर्जे, तुमची खरेदी बिले, क्रेडिट कार्डचे बिल, तुम्ही बँकेला देय असलेली रक्कम तुम्ही वेळेत फेडली आहे का, तुमच्या कर्जाचे रिपेमेंट शेड्युल तुम्ही पाळले आहे का, तुम्ही वेळच्या वेळी बँकेने ठरवून दिलेल्या तारखेला तुमचा कर्ज हप्ता फेडला आहे का, याची एका विशिष्ट यंत्रणेने केलेली सूक्ष्म तपासणी म्हणजेच तुमचा सिबिल स्कोअर.
CIBIL SCORE म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड, ज्याला ट्रान्सयुनियन CIBIL असेही म्हणतात. त्यांच्याद्वारे निर्माण होणारी आकडेवारी अर्थात स्कोअर हा सिबिल स्कोअर म्हणून ओळखला जातो. संपूर्ण भारतात सर्वात जास्त स्वीकारला जाणारा हा क्रेडिट स्कोअर आहे. CIBIL ही यंत्रणा विविध बँका, NBFC आणि इतर कर्ज देणाऱ्या कंपन्यांकडून माहिती गोळा करते, जेणेकरून एखाद्या व्यक्तीची क्रेडिट पात्रता (पतमर्यादा) ठरवून तिचा स्कोअर घोषित केला जातो. वरील मुद्द्यांवरून सर्वोत्तम सिबिल स्कोअर कोणता? हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. सिबिल ट्रान्सयुनियनचा स्कोअर ३०० ते ९०० पर्यंत असतो आणि ७०० या अंकाच्या वर असलेला कुठलाही सिबिल स्कोअर चांगला मानला जातो.
कर्ज प्रक्रिया आणि तिची परतफेड सोपी करण्यासाठी सिबिल यंत्रणेने काही परिमाण घोषित केले आहेत. त्यालाच सिबिल स्कोअर रेंज क्रेडिट वर्थिनेस असे म्हणतात. तुमचा सिबिल स्कोअर ७५० ते ९०० च्या आसपास असेल तर तो सर्वोत्तम समजला जातो. ७०० - ७४९ च्या दरम्यान असेल, तर तो चांगला असे समजावे. ६५० - ६९९ यादरम्यान असेल तर तो योग्य किंवा ठीकठाक समजला जातो. हा सिबिल स्कोअर ६०० - ६४९ याच्या आसपास असेल तर तुम्हाला त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. ही आकडेवारी ६०० च्या खाली असेल तर तुम्हाला तातडीने हालचाली कराव्या लागतील. अशा प्रकारचा न्यूनतम सिबिल स्कोअर तुम्हाला वाढवावा लागेल. एक गोष्ट लक्षात घ्या, सर्वोत्तम सिबिल स्कोअरमुळे तुम्हाला कुठल्याही बँकेकडून कर्ज मिळण्याची शक्यता वाढते. कर्ज देताना बँक तुम्हाला प्राधान्य देऊ शकते.
सिबिल स्कोअर वाढवायचा कसा?
* जर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर वाढवायचा असेल, तर पुढील बाबींचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.
* सर्वप्रथम आर्थिक जगतात तुमची पतमर्यादा काय आहे, याची तपासणी करा. त्यासाठी क्रेडिट रिपोर्ट महत्वाचा असतो.
* क्रेडिट स्कोअर पाहिल्यानंतर सर्वप्रथम तुमचा क्रेडिट रिपोर्ट काळजीपूर्वक तपासा. यात झालेल्या चुका दूर करण्याचा प्रयत्न करा.
* कुठल्याही लहानमोठ्या कर्जाची परतफेड अगदी न चुकता, वेळेवर करा.
* तुमचे कर्जाचे हप्ते, तुमचे क्रेडिट कार्ड बिल दरमहा वेळेवर आणि पूर्ण भरा.
* लक्षात घ्या, यात तुम्ही कसूर केली तर त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
* जर तुम्हाला एखाद्या महिन्यात तुमचे बिल किंवा कर्जाचा हप्ता भरण्यात अडचण येत असेल, तर देय तारखेपर्यंत किमान रक्कम तरी अवश्य भरा.
* तुमचे कर्ज आणि इतर देणी फेडण्यासाठी तुम्ही अक्षम ठरत आहेत, असे तुम्हाला वाटत असेल, तर लहान रकमेचे वैयक्तिक कर्ज घेण्याबाबत विचार करा.
* या कर्जाचे व्याजदर जास्त असू शकतात, परंतु जर तुम्ही वेळेवर पेमेंट करत राहिलात तर तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर हळूहळू वाढेल.
* तुम्ही बँक अथवा इतर संस्थांकडून घेत असलेल्या कर्जाचा विचार करा. वारंवार कर्ज घेणे ही सवय तुमच्यासाठी घातक ठरू शकते. तुमच्या कर्जांवर मर्यादा घाला.
* एकाच वेळी खूप कर्जे घेतल्याने किंवा पेमेंट करू न शकल्याने तुमच्या क्रेडिट स्कोअरवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
* ज्या ज्या संस्थांकडून तुम्ही कर्ज घेतले आहे, त्याची कालमर्यादा वाढवून ते हप्ते वेळच्या वेळी भरा.
* जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करीत असाल, तर त्यावरील खर्चाची मर्यादा पाळा. क्षमतेपेक्षा अधिक खर्च करणे तुमच्यासाठी धोकेदायक ठरू शकते.
* तुम्ही नियमितपणे कर्ज फेडले नाही तर बँक किंवा अन्य संस्था तुम्हाला वन टाईम सेटलमेंट करण्याची ऑफर देऊ शकते. यात एकाच वेळी छोटेसे पेमेंट केल्याने तुमचे कर्ज फेडले गेले आहे, असे मानले जाते. परंतु याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर सर्वात जास्त नकारात्मक परिणाम होतो, ही गोष्ट ध्यानात ठेवा.
* तुम्ही घेत असलेल्या कुठल्याही कर्जाचे आगाऊ नियोजन करणे तुमच्या फायद्याचे ठरते. कर्जासाठी बेजबाबदारपणे अर्ज केला तर तुम्हाला हप्ते भरताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तुमच्या कर्ज हप्त्याची मोजणी आधीच करण्यासाठी ईएमआय कॅल्क्युलेटर वापरा आणि तुम्हाला झेपेल तेवढाच कर्जाचा हप्ता स्वीकार करा.
लक्षात घ्या, कुठल्याही बँकेकडून, पतसंस्थेकडून कर्ज मिळवण्याचा प्रयत्न करताना चांगला सिबिल क्रेडिट स्कोअर महत्त्वाचा असतो. तुमचा सिबिल स्कोअर चांगला असण्याचे अनेक फायदे आहेत.
सिबिल स्कोअर चांगला असण्याचे फायदे
* सिबिल स्कोअर चांगला असणे हे तुम्ही एक जबाबदार कर्जदार आहात हे सिद्ध करते.
* तुम्ही घेतलेले कर्ज बँकेने ठेवून दिलेल्या कालावधीत फेडले आहे, तुम्ही तुमचे कर्ज वेळेवर भरले आहे, हे तुमच्यासाठी खूपच महत्वाचे असते.
* पहिले कर्ज तुम्ही वेळेत फेडले असेल, तर बँक तुम्हाला पुन्हा एकदा कमी व्याजदरावर कर्ज देण्यासाठी प्राधान्य देते.
* मोठ्या रकमेचे कर्ज मिळवणे अधिक सोपे होते.
* बँक आणि ग्राहकामध्ये परस्पर विश्वासाचे नातेसंबंध निर्माण होतात.