
आर्थिक घोटाळ्यांपासून सुरक्षित राहण्याचे साधेसोपे मार्ग व उपाय
कष्टाने, मेहनतीने मिळवलेल्या पैशांचे, संपत्तीचे रक्षण करण्यासाठी तुम्ही काय करता, असा प्रश्न एखाद्याला विचारला तर त्याचे उत्तर काय येईल....? बँकेमध्ये ठेवतो, असे त्याचे सरळसाधे उत्तर आहे. हे उत्तर १०० टक्के बरोबर आहे. बँक खात्यात असलेल्या आपल्या पैशांविषयी आपण सगळेच निर्धास्त असतो. कारण त्या बँक खात्याचे नियंत्रण आपल्या हाती असते. पण आताच्या ऑनलाईन जमान्यात बँक खात्याचे नियंत्रण आपल्या हाती असण्याबरोबरच गरज आहे सजगतेची, दक्षतेची आणि जागरूकतेची. कारण आर्थिक घोटाळे, ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार, सायबर क्राईमची संख्या वरचेवर वाढत आहे. विज्ञान - तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेऊन चोरटे एका क्षणात तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात. तुमची एक चूक, तुमचे एक दुर्लक्ष तुम्हाला आर्थिक नुकसानीच्या खाईत ढकलू शकते. आर्थिक फसवणूक कुठल्याही मार्गाने होऊ शकते. वाढीव व्याजदराचे आमिष, बक्षीस जिंकल्याची बतावणी करून किंवा तुमच्या बँक खात्याची माहिती विचारून तुमची फसवणूक होऊ शकते. आजकाल आर्थिक घोटाळे आणि ऑनलाइन फसवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे, लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून फसवले जात आहे. आर्थिक फसवणुकीपासून दूर राहायचे असेल, तर सर्वप्रथम नेहमी जागरूक, सजग राहावे लागेल. अनोळखी लोकांनी दिलेल्या ऑफर्स नाकाराव्या लागतील. अधिक व्याजदराचे, दामदुपटीचे प्रलोभन ओळखावे लागेल. आज जाणून घेऊया ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी काय करावे? ऑनलाईन व्यवहारांच्या जमान्यात आर्थिक सुरक्षा कशी मिळवावी, यावरील काही उपाय !
हे काही उपाय तुमच्या पैशांच्या सुरक्षेसाठी
* अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या ईमेल किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका.
* कोणतीही माहिती देण्यापूर्वी, त्या त्या वेबसाईटची सत्यता तपासा.
* बँक खात्यावरील व्यवहारांसाठी मजबूत पासवर्ड वापरा आणि तो कोणालाही सांगू नका.
* तुमच्या बँक खात्यातील व्यवहारांची नियमितपणे तपासणी करा.
* कोणतीही संशयास्पद गोष्ट दिसल्यास, सर्वप्रथम बँकेला किंवा पोलिसांना कळवा.
* बँक व्यवहार करताना नेहमी जागरूक राहा आणि आपल्या आजूबाजूला काय चालले आहे यावर लक्ष ठेवा.
आजघडीला संपूर्ण जग हे एक गाव असल्यासारखे झाले आहे. स्मार्टफोनमुळे घरबसल्या काहीही खरेदी करता येण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ही सुविधा असली तरी, त्याबरोबरच अनेक धोकेही आपल्याजवळ आले आहेत, याकडे लक्ष द्या. आजकाल ऑनलाइन फसवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे आपले पैसे सुरक्षित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. पुढील काही उपायांद्वारे तुम्ही ऑनलाईन घोटाळ्यांपासून स्वतःचे रक्षण करू शकता !
मजबूत, कठीण पासवर्ड वापरा
तुमच्या बँक खात्यासाठी आणि इतर महत्त्वाच्या ऑनलाइन खात्यांसाठी मजबूत, कठीण पासवर्ड वापरा. तुमच्या पासवर्डमध्ये अक्षरे, अंक आणि चिन्हे यांचा समावेश करा. वेगवेगळ्या खात्यांसाठी एकच पासवर्ड वापरणे टाळा.
अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका
मोबाईल फोनवर आलेली बक्षिसाची लिंक, लकी ड्रॉ ऑर याविषयीचे अनोळखी लोकांनी पाठवलेले ईमेल किंवा मेसेजना कुठलाही प्रतिसाद देऊ नका. अशा सेंडर्सना तुम्ही ब्लॉक करू शकता. अनोळखी लोकांनी पाठवलेल्या लिंक्सवर क्लिक करू नका. फिशिंग लिंक्स तुमच्या खात्याची माहिती चोरू शकतात.
सार्वजनिक वायफाय वापरणे टाळा
सार्वजनिक वायफाय वापरून ऑनलाइन व्यवहार करू नका. सार्वजनिक वायफाय सुरक्षित नसते आणि हॅकर्स तुमची वैयक्तिक माहिती चोरू शकतात.
बँक स्टेटमेंट नियमितपणे तपासा
तुम्ही करीत असलेली पैशांची देवाणघेवाण, पेमेंट्स, खरेदी बिले यांची नेहमी तपासणी करावी. तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम बरोबर आहे, याची पडताळणी करावी. त्यासाठी तुमचे बँक स्टेटमेंट नियमितपणे तपासा. ही सवय अंगी लावून घेतली तर तुम्ही नेहमी सुरक्षित राहू शकता. कोणताही संशयास्पद व्यवहार आढळल्यास बँकेला त्वरित कळवा.
अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरा
तुमच्या कॉम्प्युटर आणि मोबाईलमध्ये अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरा. हे सॉफ्टवेअर तुम्हाला व्हायरस आणि मालवेअरपासून वाचवू शकते. उगाच कारण नसताना कुठल्याही वेबसाईटला भेट देणे, सर्चिंग करणे अशा गोष्टी धोकेदायक ठरू शकतात.
ओटीपी कोणालाही सांगू नका
ऑनलाईन व्यवहार करताना आलेला ओटीपी कोणालाही सांगू नका. तुमचा ओटीपी हा फक्त तुमच्यासाठी आहे, हे लक्षात ठेवा. सायबर गुन्हेगार या क्रमांकाचा गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे ओटीपी कोणालाही सांगू नका. बँक कधीही तुमचा ओटीपी मागत नाही.
सोशल मीडियावर माहिती शेअर करणे टाळा
सोशल मीडिया वापरणे हा आता अनेकांचा छंद झाला आहे. पण त्याचा काळजीपूर्वक वापर व्हायला हवा. सोशल मीडियावर तुमची वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळा. तुमचा पत्ता, फोन नंबर किंवा बँक डिटेल्स सोशल मीडियावर शेअर करू नका.
नेहमी जागरूक राहा
कोणतीही ऑफर कितीही आकर्षक वाटली तरी, तिची सत्यता तपासा. खूप कमी किमतीत मिळणाऱ्या वस्तू किंवा लॉटरी जिंकल्याचा मेसेज हे फसवे असू शकतात.
फिशिंगपासून सावध राहा
फिशिंग म्हणजे तुमच्याकडून गोपनीय माहिती चोरण्याचा प्रयत्न करणे. तुम्हाला कोणी बँक अधिकारी असल्याचे सांगून माहिती मागत असेल, तर सावध राहा. बँक कधीही फोनवर किंवा ईमेलवर तुमची माहिती मागत नाही.
सुरक्षित वेबसाइट वापरा
ऑनलाइन खरेदी करताना वेबसाइट सुरक्षित आहे का हे तपासा. वेबसाइटच्या URL मध्ये 'https' आणि लॉक चिन्ह (कुलुपाचे चिन्ह) असल्याची खात्री करा. विश्वासार्ह कंपनीकडूनच ऑनलाईन खरेदी करा.
तुमच्या शंकांचे निरसन करा
बँक खाते, बँक व्यवहारांबाबत कोणतीही शंका असल्यास, बँकेच्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधा. शक्य असल्यास प्रत्यक्ष बँकेला भेट द्या. ऑनलाइन फसवणुकीच्या बाबतीत पोलिसांना तक्रार करा.
वरील उपायांचा अवलंब केला तर तुम्ही ऑनलाइन घोटाळ्यांपासून स्वतःचे पैसे सुरक्षित ठेवू शकता. सदैव जागरूक राहा, सतर्क राहा.