
सावधान..! डिजीटल बँकिंग करताय मग 'ही' माहिती अवश्य वाचा !
आजच्या डिजीटल युगाने सर्वच क्षेत्रे व्यापली आहेत. बँकिंग क्षेत्रातही याचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. जवळपास सर्वच बँकांनी ग्राहकांना बँकिंग संबंधित विविध कामे घरबसल्या अवघ्या काही मिनिटांत करण्याची सेवा उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी बँकिगसंबंधित छोट्याशा कामासाठीही बँकेच्या लांबच लांब रांगेत तासनतास ताटकळत उभे राहावे लागत होते. परंतु आता डिजीटल बँकिंगमुळे ग्राहकांचा आणि बँकांचाही वेळ आणि श्रम दोन्ही वाचले आहेत.
डिजीटल माध्यमातून आर्थिक व्यवहार ज्या वेगाने वाढत आहेत, त्याच वेगाने ऑनलाईन फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. यावरून डिजीटल बँकिंगचे जसे विविध फायदे आहेत, तशा त्याच्या काही धोकादायक बाजूही आहेत. डिजीटल बँकिंग करताना आपल्या बेसावधपणामुळे आपली आर्थिक सुरक्षितता धोक्यात येण्याची दाट शक्यता असते. या धोक्याचा फायदा घेऊन डिजीटल बँकिग युजर्सच्या चुकीवर लक्ष ठेऊन असलेले सायबर ठग लोकांना गंडा घालतात.
आपणही वेळीच सावध व्हा आणि डिजीटल माध्यमातून आर्थिक व्यवहार करत असाल तर पुढील काळजी नक्की घ्या !
- आपणांस कुणी तुमचे बँक खाते ब्लॉक झाले असल्याचा मेसेज पाठवून व्यक्तिगत माहिती मागत असेल तर असे मेसेज पूर्णपणे फसवे आहेत. अशा मेल किंवा मेसेजना कधीही प्रतिसाद देऊ नका.
- अनोळखी नावाने आलेले ईमेल, एसएमएसमधील लिंक किंवा अटॅचमेंटवर कधीही क्लिक करू नका.
- लॉटरी लागली, कस्टम सामान सोडविणे, अनपेक्षित सूट किंवा मोफत भेटवस्तू अशा प्रलोभनांना बळी पडू नका !
- बँक खाते, एटीएम किंवा डेबिट कार्ड क्रमांक, पासवर्ड आणि ओटीपी कुणासोबतही शेअर करू नका.
- तुमचा पासवर्ड वेळोवेळी बदलावा, जन्मतारीख किंवा मोबाईल क्रमांक असे सहज कळणारे पासवर्ड ठेऊ नका !
- सार्वजनिक ठिकाणी दिलेले मोफत वाय-फाय आर्थिक व्यवहारासाठी वापरू नका
- ऑनलाईन बँकिंगचे युजर्स नेम किंवा पासवर्ड कधीही सेव्ह करून ठेऊ नये
काही संशयास्पद मेल, कॉल अथवा मेसेज आल्यास सायबर सुरक्षा विभागास संपर्क करा !